प्रशिक्षणाने कर्मचारी ज्ञानसंपन्न होतो, यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे त्याला बदलत्या काळानुसार स्वत:ला अद्यावत राहण्यासाठी एक प्रकारचे मानसिक आत्मबल मिळते. याचाच लाभ पर्यायाने संस्था वाढीवर होतो. पण बव्हंशी असे आढळून येते की, संस्था जेव्हा कामकाज बंद ठेवून कर्मचारी वा संचालक मंडळातील सदस्यांना अशा विविध प्रकारच्या प्रशिक्षण सत्रात पाठविते तेव्हा प्रत्यक्षात ही थोरथोर मंडळी तीन दिवसांची सहल याच दृष्टिकोनातून त्याकडे पाहतात. मग अंती यातून काय साध्य होणार?
वास्तविक प्रशिक्षण संस्थांमधून विविध प्रकाराचे स्वाध्याय दिले जातात. त्याचे वाचन, चिंतन व मनन करून त्या त्या व्याख्यात्याचे नुसते भाषण न ऐकता आपल्या नैमित्तिक कामकाजातील शंका विचाराव्यात, जेणे करून तो कर्मचारी वा संचालक अधिक समृद्ध होत जातो व पर्यायाने ती संस्थाही अधिक सुदृढ होऊ शकते. त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावत जातात. प्रशिक्षण वा पदविका म्हणजे एक अधिक वेतनवाढ एवढाच मर्यादित अर्थ नव्हे. चर्चा सत्रे आखून त्यात सहभागी होणे, केस स्टडी इ. सारख्या उपक्रमातून नवनवीन संकल्पना उदयास येतात व त्याचा लाभ दैनंदिन कामकाज सुधारण्यासाठी होतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. आता तर प्रशिक्षणामध्ये दृक्-श्राव्य माध्यमाचा अत्यंत प्रभावी उपयोग केला जातो. मला असे प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते की, कर्मचारी वा संचालक मंडळ याना बॅंकेचा ताळेबंद, नफातोटा पत्रक वाचता आले पाहिजे. आज असे दिसते की व्यवस्थापक वा लेखा विभागाने अहवाल, ताळेबंद, नफातोटापत्रक, अंदाजपत्रक तयार करावयाचे आणि पदाधिकाऱ्यांनी ते मंजूर करावयाचे, एवढ्यावरच ते मर्यादित आहे. परंतु प्रत्यक्षात संबंधितांना तयार केलेला अहवाल, ताळेबंद, नफातोटा पत्रक, अंदाजपत्रक इ. यावर सखोल चर्चा करून संस्था नेमकी कुठे कमी पडते आहे?, या बाबत दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. आता कॅमल्स पद्धती अंगिकारली गेली आहे, त्याचा अभ्यास करून आपल्या संस्थेला अधिकाधिक मार्कस् कुठे मिळू शकतात ?, जेणे करून बॅंकेच्या वर्गवारीवर त्याचा अपेक्षित परिणाम होऊ शकतो. व्यवस्थापक वा मुख्य कार्यकारी अधिकारी याने हे करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे बॅंकेचा लेखापरीक्षण, जोखिम मालमत्ता अशा प्रकारच्या ज्या उपसमित्या आहेत, त्या अत्यंत दक्ष व अभ्यासू असणे आवश्यक आहे. परंतु तसे दिसत नाही. अहवाल, ताळेबंद, नफातोटा पत्रक अंदाजपत्रक यांचा आपसात ताळमेळ बसतो आहेे?, का याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. संचालक मंडळाने बॅंकेचे उपविधी, सहकार कायदा वा तत्सम कायदे यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. कित्येक संचालक मला असे आढळून आले आहेत की, ते ज्या बॅंकेचे संचालक आहेत त्या बॅंकेच्या ठेवी, कर्जे किती आहेत वा खेळते भांडवळ किती आहेे? याबाबतही अज्ञानी असतात. याला काय म्हणावे? आपण ज्या संस्थेचे पालकत्व स्विकारलेले आहे, ती संस्था जोमाने व निरोगीपणे कशी वाढेले? यासाठी स्वत: ज्ञानसमृद्ध असणे अनिवार्य आहे असे वाटते. परंतु याचे प्रमाण किती? परंतु प्रशिक्षणाने या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा पुरेपूर फायदा घेतला तर संस्थेची भरभराट दूर नाही. यामुळे संस्थेतही व्यावसायिकता येईल, फरक पडेल.आता संस्था या समाजसेवी स्वरूपाच्या राहिलेल्या नसून त्यात पूर्णपणे व्यावसायिकता आली आहे आणि ती संस्था नफा मिळविणारीच असली पाहिजे, अशी आजच्या काळाची समीकरणे झाली आहेत. कर्मचारी वर्ग व संचालक मंडळ यांनी सजग राहणे, ही आता काळाची गरज नसून ती अत्यावश्यक बाब झाली आहे. त्यामुळे शासन व रिझर्व्ह बॅंक यांच्या नित्यनैमित्तिक बदलणाऱ्या धोरणास सामोरे जाण्याचे सामर्थ्य कर्मचारी व संचालक यांच्यात येईल, यात संशय नाही.
बॅंकांना भेडसावणारा एक ज्वलंत प्रश्न म्हणजे कर्जवसुली. यासाठी सहकार कायदा कलम 101 बरोबरच तदनुषंगिक अन्य कायद्यांचेही सखोल ज्ञान वसुली अधिकारी/व्यवस्थापक यांना असणे अत्यावश्यक आहे. याबाबत असे आढळून आले आहे की, सहाय्यक निबंधक लवादी हुकूनामे देताना कर्जदाराकडून प्रथम वसुली करावी व नंतर जामिनदारांवर वसुली कारवाई करावी, असे निर्णय देतात. यातून असे प्रश्न निर्माण होतात की, मग उच्च/सर्वोच्च न्यायालय यांचे निर्णय वा संबंधित कायद्यातील तरतुदींचे काय? याबाबत जर बॅंक कर्मचारी/अधिकारी वा संचालक सजग वा ज्ञानसमृद्ध असतील तर या गोष्टी घडणारच नाहीत किंवा असे निर्णय देण्याचे साहस असे अधिकारी करणारच नाहीत. परंतु अज्ञानामुळे वा हलगर्जीपणा मुळे मग संस्था अडचणीत येते. कर्जदार संघटना उभ्या राहतात व शेवटी संस्था आर्थिक संकटात येते. याचे परिणाम सार्वत्रिक होतात याचे भान संबंधितानी ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे यावर अवलंबून असलेले प्रमुख घटक म्हणजे ठेवीदार, सभासद, कर्मचारी हे हकनाक भरडून निघतात. घेतलेले कर्ज हे फेडलेच पाहिजे. ज्या काही अडचणी असतील त्या संस्थेशी संपर्क साधून सामोपचाराने सोडाव्यात.
प्रशिक्षण घेऊन त्याचा सर्वांगीण वापर संस्था विकासासाठीच होणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाकडे पाहू नये, त्यातून मिळणारे ज्ञान पहावे. कारण हे रुजत घातलेले बीज उद्या विशाल वृक्षाच्या रूपाने संस्थेस सावली देणार आहे. परंतु हा खर्च संस्थेने केला आहे. त्याचा उपयोग संस्थेसाठी करण्याची जबाबदारी कर्मचारी यांच्यावरच अंती येत, त्यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे. आपली दालने अशा विविध ज्ञानाने समृद्ध होणे अनिवार्य आहे. ही व्यावहारिक गुंतवणूक नसून दूरगामी फळे देणारी भांडवली गुंतवणूक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या प्रशिक्षणामुळे कर्मचारी वा संचालक यांच्या एकंदर कार्यपद्धतीत सुधारणा हाऊन संस्था वाढीवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. व्यवसाय वाढ, कार्य पद्धती यामुळे एकंदर रोज नवनवीन स्पर्धांना तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात वाढीस लागते. सहजिकच प्रशिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रीया आहे, असे म्हटले तर तो वदतोव्याघात ठरू नये. प्रशिक्षण ही ज्ञानधिष्ठित प्रणाली आहे. कौशल्य अंगी बाणविण्याची प्रक्रिया आहे, प्रशिक्षण हा ज्ञानयज्ञ आहे. हे अग्निहोत्र सतत धगधगते राहणे अत्यावश्यक आहे. तसेच बाजारात होणाऱ्या नवीन नवीन बदलांची नोंद घेऊन आपणही ज्ञानाने अद्यावत असणे अनिवार्य ठरते आहे. कारण आता केवायसी बरोबरच इलेक्ट्रॉनिक करन्सी, प्लास्टो करन्सी यांचे निकषही कर्मचारी व संचालक याना माहीत असणे गरजेचे आहे.
आज कर्मचारी/संचालक याना नवनवीन तंत्रज्ञानाला सामोरे जावे लागते आहे. त्यासाठी प्रशिक्षणासारखे उत्तम साधन असेल तर कुठल्याही अडचणीला तोंड देण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी येऊ शकेल. आता खाजगी व राष्ट्रीयकृत बॅंका शहरे व ग्रामीण भागात मुसंडी मारू लागल्या आहेत. हे एक नवीनच व तगडे आव्हान या सहकारी बॅंकांना आहे. दारोदार सेवा देण्याचा त्यानी चंग बांधला आहे. या स्पर्धेत सहकारी बॅंका कुठे आहेत? साहजिकच ग्राहकवर्ग तिकडे ओढला जातो आहे. आपल्या आत्याधुनिक सेवांद्वारे या बॅंका ग्राहकवर्ग आकर्षित करीत आहेत. हा वर्ग आपल्याकडे वळविणे तितकेसे सोपे अजिबात नाही.
आज अनेकाविध प्रकारच्या विषयांचा प्रशिक्षणात समावेश केलेला असतो. एनपीए व्यवस्थापन, कर्ज वसुली, कर्ज मंजुरी, सभा व्यवस्थापन, ओएसएस प्रणाली, क्रेडीट अप्रायजल, जोखीम-मालमत्ता, स्वॉट ऍनालिसेस, विविध रेश्योज, लॉॅन्ग फॉर्म ऑडिट, कॅमल्स रेटींग/कार, बेस रेट इ. अनेक विषय असून त्याचे जे विविधांगी पदर आहेत आणि त्याबाबत कर्मचारी/ संचालक ज्ञान समृद्ध असणे अत्यावश्यक आहे. आता विमा सेवाही काही बॅंकांनी ग्राहक सेवेत समाविष्ट केली आहे व ते एक व्यवसायाचे परिमाण ठरले आहे. असे आढळून येते की, आम्हाला प्रशिक्षणाची गरज काय? वा कर्मचारी वर्ग शिकून काय करणार? पण इथेच मूलभूत चूक होण्यास सुरूवात होते. अणि मग सारी घडीच विस्कटू शकते, हे त्यावेळी लक्षात येत नाही आणि मग संस्थेचा ऱ्हास सुरू होण्यास वेळ लागत नाही. संगणक प्रणालीमध्ये काय आहे? याचे ज्ञान प्रशिक्षणाने येऊ शकते अन्यथा त्याचा योग्य वापर करता येणार नाही. आज सार्वत्रिक अनुभव असाच येतो की, कर्मचारी याबाबत फारच अनभिज्ञ असतात वा आपणास ज्ञान आहे असे दर्शविले तर सर्व काम आपल्यालाच करावे लागणार, असा अनाठायी गंड वा मानसिकता होऊ लागली आहे. परंतु सहकार क्षेत्रात होत असणाऱ्या या वेगवान बदलांना सामोरे जायचे असेल तर प्रशिक्षणाने आपला पाया अधिक घट्ट होणे अत्यावश्यक आहे. आर्थिक शिस्त व पारदर्शकताही व्यवहारात येणे आवश्यक आहे.
वास्तविक त्या त्या विभागातील सहकारी संस्थांनी एकत्र येऊन अशी विविध विषयांवर पूर्णवेळ एकदिवसीय कां होईना पण प्रशिक्षणाची सत्रे सातत्याने आयोजिली पाहिजेत. त्या त्या विषयातील तज्ञ व्याख्याते बोलावून असे कार्यक्रम आखले तर सर्वच बाबतीत फायदेशीर ठरू शकते. एक म्हणजे एकाचवेळी सर्व कर्मचारी वा संचालक यांचा त्यात सहभाग वा समावेश करता येईल. एकमेकांच्या परस्पर कार्यप्रणालीवर चर्चा व त्यातून नवनवीन संकल्पनांचे/विचारांचे आदान-प्रदान होण्यास मदत होईल व आपापसात एक सुसंवादाचा अदृष्य सेतू निर्माण होईल.
कर्मचारी नियुक्त झाल्यानंतर त्याला आपण ज्या विभागात किंवा ज्या खात्यावर काम पहातो त्याचे सखोल ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. अलिकडे संगणकप्रणालीमुळे एका बटणावर सर्व माहिती उपलब्ध होत असते. उदा. ठेवीवरील वा कर्जावरील व्याज प्रत्यक्ष कसे आकारावे याचे ज्ञान नसते. संगणकावर मिळते ना? मग मेहनत कशाला घ्या? आता संगणकामुळे ठेवी, कर्जे, भागभांडवल इ. चे मासिक बॅलन्सिंग घेणे बंद झाले आहे. हे कसे करतात? याचे ज्ञान अलिकडील कर्मचारी/संचालक याना आहे काय? याचे उत्तर कदाचित नकारार्थीच येईल. यासाठी नव्या जुन्या कर्मचारी वर्गात सुसंवाद असणे आवश्यक आहे.
संचालक मंडळास धोरणे ठरविताना व त्यांचे नियोजन करताना त्या त्या विषयांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तज्ञ संचालकांचा त्यात आत्मीय सहभाग असणेही अनिवार्य आहे. काम करताना चुका या होणारच कारण, जो काम करतो तोच चुकतो. निष्क्रिय माणूस कधीच चुकत नाही. पण या चुकामुळे संस्था अडचणित येता नये. यास्तव टप्प्या टप्प्याने सर्व संचालक व कर्मचारी हे प्रशिक्षित झालेच पाहिजेत. याचबरोबर प्रत्यक्ष अनुभवही देणे गरजेचे आहे. न पेक्षा प्रशिक्षणाची वा एखादी सहकारातील घेतलेल्या पदविकाचे प्रमाणपत्र बॅंकेच्या फाईल ठेवायचे आणि काम शून्य असे दारूण चित्र दिसता नये. नाही तर वर म्हटल्याप्रमाणे ती एक सहल असेच होईल. निष्पन्न काहीच होणार नाही. प्रशिक्षणाने कर्मचारी व संचालक यांच्या मध्ये नित्यनूतन होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्याचे सामर्थ अंगी खचितच बाणेल हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
काम करताना कामाचा आनंद घेतला तर संस्था सुदृढ होऊ शकते व ग्राहकराजाही समाधानी राहू शकतो. हे घडू शकते….परंतु प्रशिक्षण हवे व त्याचा वापर करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हवा, मानसिकता हवी. तरच उद्या जवळ आहे अन्यथा…..
प्रकाश वीरकर
मुख्य कार्यकारी अधिकारी
रत्नागिरी बॅंक
9422629346